ग्रामपंचायत आंबे, ता. शिरपूर, जि. धुळे

Gram Panchayat Ambe, Tal. Shirpur, Dist. Dhule

महिला शेतकरी परसबाग प्रशिक्षण – आत्मनिर्भरतेकडे एक पाऊल

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या अंतर्गत कार्यरत कृषी विज्ञान केंद्र, धुळे यांच्या माध्यमातून आंबे गावातील महिला शेतकऱ्यांसाठी परसबाग विषयक विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश महिलांना घरच्या अंगणात, उपलब्ध जागेचा योग्य वापर करून, कुटुंबाच्या पोषणासाठी ताज्या आणि सेंद्रिय भाज्यांचे उत्पादन घेण्यास प्रोत्साहन देणे हा होता.

या प्रशिक्षणात मार्गदर्शकांनी महिलांना परसबागेची रचना, मौसमानुसार भाजीपाला निवड, सेंद्रिय खते तयार करण्याची पद्धत, कंपोस्टिंग, किड व रोग व्यवस्थापन, तसेच ड्रिपद्वारे पाणी व्यवस्थापन यांची सविस्तर माहिती दिली. विशेषतः रासायनिक खतांच्या वापरामुळे उत्पन्न होणारे दुष्परिणाम, आणि त्याऐवजी घरच्या घरी उपलब्ध होणाऱ्या पदार्थांतून सेंद्रिय खत कसे तयार करता येते याचे उत्तम मार्गदर्शन देण्यात आले.

महिला शेतकरी प्रशिक्षणाच्या माध्यमातून सुदृढ आहार, कुटुंबाचे आरोग्य, आणि हिरवेगार घरकुल या संकल्पनांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. परसबाग ही फक्त बाग नसून एक आत्मनिर्भरतेचा मार्ग, घरगुती खर्चात बचत, आणि महिलांच्या नेतृत्वक्षमतेचा विकास करणारी एक उपक्रमशील संधी आहे, हे या प्रसंगी सांगण्यात आले.

प्रशिक्षणात सहभागी झालेल्या महिलांनी उत्साहाने सहभाग नोंदवला आणि आपल्या घरी परसबाग उभारण्याचा निर्धार व्यक्त केला. या उपक्रमामुळे आंबे गावात पोषणसमृद्ध आहाराची चळवळ, स्वच्छ, निरोगी आणि स्वावलंबी समाज घडविण्यास नक्कीच मदत होणार आहे.

अशा प्रकारची प्रशिक्षणं केवळ शेतकऱ्यांना नव्हे तर संपूर्ण समाजाला निसर्गाशी नाते दृढ करण्यास आणि टिकाऊ जीवनशैली अवलंबण्यास प्रेरित करतात. कृषी विज्ञान केंद्र, धुळे यांचे या उपक्रमाबद्दल संपूर्ण ग्रामस्थांकडून आभार मानले गेले.

 
 

Share the Post: